जळगाव समाचार डेस्क | २३ ऑक्टोबर २०२४
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांत 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळू शकतो. मात्र, त्यांना पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा या विषयांवर आधारित अन्य कोणताही विषय घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. याबाबतचा स्पष्ट शेरा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नमूद केला जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सध्या प्रचलित पद्धतीनुसार, दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत किमान 35 गुण मिळवणे अनिवार्य आहे. मात्र, गणित आणि विज्ञान विषयांत कमी गुण मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी अपयशी ठरतात. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) दिली जाते, परंतु त्यांना पुढील शिक्षणात या विषयांचा अभ्यासक्रम घेण्यासाठी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.
या नवीन नियमामुळे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी, गणित आणि विज्ञान विषयांवर आधारित उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आव्हानात्मक ठरणार आहे.