जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
जळगाव शहरातील नयनतारा आर्केड मॉलमधील एका स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांसाठी मोठं यश ठरली असून, यामध्ये मुख्य व्यवस्थापकासह स्पा सेंटरचा मालक अटकेत घेण्यात आला आहे, तर चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून धडक कारवाई
आज दिनांक १८ एप्रिल रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड (स्थानीक गुन्हे शाखा, जळगाव) यांना गोपनीय माहिती मिळाली की नयनतारा आर्केड मॉलच्या शॉप नं. ४०८ येथील ‘03 डे स्पा सेंटर’ मध्ये मसाजच्या नावाखाली गि-हाईकांना लैंगिक सेवा पुरविल्या जात आहेत. ही धक्कादायक माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली.
ही बाब जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळवण्यात आले. तत्काळ हालचाल करत पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. यामध्ये मॅनेजर राजु माधुजी जाट (रा. कलोधिया, पिपरी, भिलवाडा, राजस्थान) याने मसाज व्यतिरिक्त इतर सेवांचे आमिष दाखवले.
मालक व व्यवस्थापक गजाआड; चार महिलांची सुटका
स्पा सेंटरवर छापा टाकल्यावर पोलिसांनी पाहिले की, चार महिलांकडून शरीरविक्रय करवून घेतला जात होता. या अनैतिक धंद्यामागे मुख्य सूत्रधार म्हणून विक्रम राजपाल (वय २०, रा. चत्तरगढ पत्ती, जिल्हा सिरसा, हरियाणा) याचे नाव समोर आले. दोघांविरुद्ध पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चार पीडित महिलांना तातडीने आशादीप निराधार महिला वसतीगृहात हलविण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू आहे.
पोलीस दलाच्या संयोजित कारवाईने शहरात खळबळ
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.नि. अनिल भवारी, सहा. पो.नि. शितलकुमार नाईक, पोउ.नि. शरद बागल, महेश घायतड, विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनिल पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, वैशाली महाजन, प्रियंका कोळी, मंगला तायडे आणि चालक दीपक चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता.
यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार – पोलीस अधीक्षकांचा इशारा
स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाईचे संकेत डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. “कोणत्याही प्रकारचा अनैतिक व्यापार शहरात सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत, यापुढे अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अधिक धडक मोहिम राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.