जळगाव समाचार | ५ मार्च २०२५
सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, डीआरआय (राजस्व गुप्तचर संचालनालय) ने कारवाई करत कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. तिच्या ताब्यातून तब्बल १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले असून, या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे.
रान्या राव सतत आंतरराष्ट्रीय दौरे करत होती, त्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. ३ मार्च रोजी ती दुबईहून इमिरेटसच्या विमानाने बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर पोहोचली. यावेळी तिच्यावर लक्ष ठेवण्यात आले. तिची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणावर तस्करी केलेले सोने आढळून आले.
रान्या हिने अधिकतर सोने शरीरावर परिधान केले होते, तसेच तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बार लपवण्यात आले होते. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, रान्या ही आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. ते सध्या कर्नाटक पोलिसांच्या डीजीपी हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे तिला काही सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती का? याचा तपास केला जात आहे.
रान्या विमानतळावर आली की, स्वतःला डीजीपीची मुलगी असल्याचे सांगून स्थानिक पोलिसांकडून विशेष सुविधा घेत होती. इतकेच नव्हे, तर ती पोलिसांना घरी सोडण्यास सांगायची. त्यामुळे या प्रकरणात काही पोलीस कर्मचारीही डीआरआयच्या रडारवर आले आहेत.
रान्या राव गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती. ती दुबईहून बंगळुरूला मोठ्या प्रमाणात सोने आणत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तिला अटक करण्यात आली.
रान्याला अटक केल्यानंतर मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हायप्रोफाईल तस्करी प्रकरणामुळे डीआरआय आणि कर्नाटक पोलिसांनी मोठी धावपळ सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.