जळगावात पुन्हा धक्कादायक घटना : स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिन्यांची चोरी

 

जळगाव समाचार | ११ डिसेंबर २०२५

शिरसोली (प्र.न.) येथील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तीन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार केलेल्या सुमनबाई चावदस पाटील यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता, मृतदेहाच्या डोक्याखालचा राखेचा भाग तसेच अस्थी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे, अंत्यसंस्कारावेळी अंगावर असलेले जवळपास दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही लंपास केल्याचे उघड झाले. या घटनामुळे पाटील कुटुंब व ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.

जळगाव शहरात स्मशानभूमीतून अस्थी आणि दागिन्यांची चोरी होण्याची ही पहिली घटना नाही. दोन महिन्यांपूर्वी मेहरूण स्मशानभूमीत गायत्रीनगरातील रहिवासी छबाबाई पाटील यांच्या अस्थी गायब झाल्या होत्या. अस्थी गोळा करण्यास नातेवाईक गेले असता त्यांच्या डोक्याचे, हाताचे व पायाचे अवशेष दिसून न आल्याने चोरीचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यासाठीच अस्थी चोरी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

याचप्रमाणे या घटनेनंतर काही दिवसांतच शिवाजीनगर स्मशानभूमीतही अशीच घटना घडली होती. जिजाबाई पाटील यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी नातेवाईक गेले असता त्यांचे डोके आणि पायाच्या भागातील अस्थी गायब झाल्या असून अंगावरील चार ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे, चोरी करून चोरट्यांनी त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचे पान ठेवून जागा रिकामी केल्याचेही समोर आले होते.

सलग तीन ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहरूणमधील पहिल्या घटनेनंतरच नागरिकांनी स्मशानभूमींमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याची आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून आवश्यक ती पावले उशिराने उचलल्याने चोरट्यांना उघडपणे धाडस करण्यास वाव मिळाल्याची टीका होत आहे. सोन्याच्या लालसेपोटी चोरट्यांची मजल आता स्मशानभूमीतील अस्थी चोरीपर्यंत गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here