१ मार्चपासून जळगावात एकेरी प्लास्टिकवर बंदीची अंमलबजावणी; होणार दंडात्मक कारवाई…

 

जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२६

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत जळगाव महानगरपालिकाने शहरात एकेरी प्लास्टिकच्या वापरावर कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ मार्च २०२६ पासून या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मनपा मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर दिपमाला काळे यांनी भूषविले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, मनपा सहाय्यक आयुक्त (आरोग्य), सर्व आरोग्य अधिकारी, प्लास्टिक असोसिएशनचे पदाधिकारी, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी तसेच ‘माझे शहर माझी जबाबदारी’ उपक्रमातील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

महापौर दिपमाला काळे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार बंदी असलेल्या एकेरी प्लास्टिकची विक्री, साठवण किंवा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून दंड न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे शहरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी १ मार्चपूर्वी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून नियमित तपासणी पथके नियुक्त करून शहरातील बाजारपेठा, व्यापारी संकुले व सार्वजनिक ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान कंपोस्टेबल बॅग, कापडी पिशव्या व इतर पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर अनिवार्य करण्याबाबत चर्चा झाली. प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी जनजागृती मोहीम, व्यापाऱ्यांशी संवाद आणि सातत्यपूर्ण निरीक्षण यावर भर देण्यात येणार आहे. महापौर दिपमाला काळे यांनी नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींना पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करत प्लास्टिकमुक्त जळगाव घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here