चांदी दोन लाखांच्या उंबरठ्यावर; सुवर्णपेठेत खळबळ…

 

जळगाव समाचार | १२ डिसेंबर २०२५

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी नोंदवली गेली. दिवसभर स्थिर वाटणारी चांदी रात्री ५,१५० रुपयांनी वाढली आणि तीन टक्के जीएसटीसह तब्बल १,९८,७९० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली. गेल्या दोन दिवसांत चांदीत १३ हजारांहून अधिक वाढ झाल्याने ग्राहक आणि सुवर्ण व्यावसायिक दोघेही अवाक झाले आहेत. बुधवारीच ८,२४० रुपयांच्या उडीनंतर चांदी १,९३,६४० रुपयांवर पोहोचली होती. आता चांदी दोन लाखांचा टप्पा किती जलद गाठते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करताच त्याचे तात्काळ परिणाम जागतिक मौल्यवान धातूंच्या बाजारात उमटले. डॉलर कमकुवत होताच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आणि आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात किंमतींनी नवे उच्चांक गाठले. चांदी प्रति औंस ६२.८८ डॉलरपर्यंत तर सोने ४,२७१.३० डॉलरपर्यंत पोहोचले. याचा थेट परिणाम भारतीय बाजारात उमटत एमसीएक्सवरील मार्च डिलिव्हरी वायदे करारात साडेअडीच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली.

आंतरराष्ट्रीय संकेत, डॉलर इंडेक्समधील दबाव, भू-राजकीय तणाव आणि फेडच्या आगामी धोरणांमुळे सोने-चांदीच्या किंमतीत पुढील काळातही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अचानक वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता आणि सावधगिरी दोन्ही भावना वाढल्या आहेत. गुंतवणूकदारांना सध्याच्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवत सावधपणे व्यवहार करण्याचा सल्ला सुवर्ण व्यावसायिकांकडून देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here