जळगाव समाचार | ११ जून २०२५
देशभरात गाजलेल्या मेघालयातील राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपे सिक्कीममध्ये हनिमूनसाठी गेल्यानंतर बेपत्ता झाले आहे. ही घटना कौशल्येंद्र आणि अंकिता या जोडप्याची आहे. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता आणि नैराश्याचे वातावरण आहे.
कौशल्येंद्र आणि अंकिता यांचा विवाह ५ मे रोजी झाला होता. त्यानंतर २६ मे रोजी दोघेही हनिमूनसाठी सिक्कीमला गेले होते. मात्र, २९ मे रोजी सिक्कीममध्ये झालेल्या एका अपघातात त्यांच्या वाहनाचा खोल दरीत पडण्याचा प्रकार घडला. या वाहनात एकूण ११ पर्यटक प्रवास करत होते. या दुर्घटनेनंतर कौशल्येंद्र आणि अंकिता यांच्याशी कोणताही संपर्क साधता आलेला नाही.
अंकिताचे वडील राजेश सिंग हे प्रतापगडमधील धनगड सराई येथील रहिवासी असून, कौशल्येंद्रचे वडील शेर बहादूर सिंग सांगीपूर रहाटीकर गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर दोघांचाही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीय तणावाखाली आहेत. सिक्कीममध्ये सतत खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. रस्त्यांची परिस्थितीही बिकट झाल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. अपघातस्थळी अद्याप दोघांचे साहित्य देखील सापडलेले नाही.
कौशल्येंद्रचे वडील शेर बहादूर सिंग, अंकिताचा भाऊ आणि इतर कुटुंबीय ३१ मे रोजी स्वतः सिक्कीमला पोहोचले होते. त्यांनी अनेक दिवस शोधाशोध केली, मात्र कोणतेही ठोस संकेत न मिळाल्याने ते निराश मनाने प्रतापगडला परतले. कुटुंबीय अजूनही आशेवर आहेत, मात्र काळ जसा पुढे जात आहे तशी चिंता आणि नैराश्य वाढत आहे. विशेष म्हणजे, या मानसिक तणावामुळे शेर बहादूर सिंग यांची तब्येतही ढासळू लागली असून त्यांची प्रकृती चिंतेचा विषय बनली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. तसेच राज्यपालांनी या प्रक्रियेस गती देण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण परिसरात शोधकार्य सुरू असले तरी अद्याप या जोडप्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.