जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२६
जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच स्मृतिदिनानिमित्त अनुभुती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाद्वारे मोठेभाऊंना स्वरांजली अर्पण करण्यात आली. मोठेभाऊंनी ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना नेहमीच ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र लाभावे, यासाठी प्रेम, संस्कार आणि मूल्यांची जपणूक केली होती. त्या आत्मीय नात्याची जाणीव जपत विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला.
‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे आणि निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘पांडुरंग नामी लागलासी ध्यास…’ या भक्तीगीताने झाली. त्यानंतर ‘देवा इंद्रायणी थांबला…’, ‘तुझ मे राम मुझ मे राम, सबमे राम समाये…’, ‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी…’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…’ आणि ‘माझे माहेर पंढरी…’ अशी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केली. प्रत्येक सादरीकरणातून मोठेभाऊंच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा जागर प्रकट होत होता.
या भक्ती संगीत संध्येतून केवळ गायनाचा आस्वादच नव्हे, तर देशाविषयी ममत्वभाव, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि मानवतेच्या नात्याने परस्परांविषयी आदर व आपुलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत संवेदनशील समाजनिर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडला.

![]()




