जळगाव समाचार, स्पोर्ट्स | २५ फेब्रुवारी २०२५
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर माजी खेळाडू आणि समीक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने संघ व्यवस्थापनावर जोरदार हल्ला चढवत त्यांना “बिनडोक आणि मूर्ख” असे संबोधले.
शोएब अख्तर म्हणाला, “मी या पराभवाने निराश झालो नाही, कारण मला आधीच याचा अंदाज होता. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने योग्य नियोजन केले नाही. संघात योग्य गोलंदाज निवडण्यात आले नाहीत, त्यामुळेच संघाचे मोठे नुकसान झाले.”
तो पुढे म्हणाला, “संघातील खेळाडूंना मैदानात जाऊन काय करायचे, हेच माहिती नव्हते. त्यांच्या खेळात आक्रमकता नव्हती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ज्या पद्धतीने उत्कृष्ट फलंदाजी केली, तसे पाकिस्तानच्या फलंदाजांना करता आले नाही. चुकीच्या वेळी हवेत फटके मारण्याच्या सवयीमुळे संघ अडचणीत सापडला.”
शोएब मलिकची निराशा गाण्याच्या ओळीत
पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यानेही आपल्या भावना गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या. शोएब अख्तरने त्याला या सामन्याविषयी विचारले असता, त्याने “दिल के अरमां आँसुओं में बह गए…” या प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या ओळी म्हणत आपल्या निराशेचा सूर लावला.
भारताच्या विजयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर पाकिस्तान संघावर माजी खेळाडूंसह चाहत्यांकडूनही जोरदार टीका होत आहे.