चोपडा : – श्री. तीर्थक्षेत्र मनूदेवी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या कारला भरधाव शिवशाही बसने धडक दिली. या अपघातात कारमधील शैलेश श्रीधर वाणी (वय ४०), निलेश श्रीधर वाणी (वय ३६, दोघ रा. निजामपूर, ता. साक्री, ह. मु. नाशिक) या दोघ भावंडांसह त्यांचा मित्र जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७, मूळ रा. गुढे. ता. भडगाव, ह. मु. नाशिक) या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता चोपडा धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ घउली. नाशिक येथे मेडीकल व्यावसायीक असलेले शैलेश वाणी व त्यांचा भाऊ निलेश वाणी हे त्यांचा मित्र जितेंद्र भोकेर यांच्यासोबत (एमएच १४, एफएम ७२०२) क्रमांकाच्या कारने यावल तालुक्यातील मनूदेवी येथे येत होते. मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते चोपडा धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्या आल्यानंतर चोपड्याहुन नाशिककडे भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच ०९, इएम १२८९) क्रमांकाच्या शिवशाही बसने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील शैलेश वाणी, निलेश वाणी, जितेंद्र भोकरे यांचा जागीच
मृत्यू झाला. तर कार चालक ओमकार प्रवीण खोंडे हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जखमी कार चालकासह मयतांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी कार चालकावर उपचार सुरु आहे. मयत वाणी बंधूच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुले असा परिवार असून एक बहीण अमेरिका येथे वास्तव्याला आहे. वाणी बंधूवर निजामपूर तर जितेंद्र भोकरे वर नाशिक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने धडक दिल्यामुळे तीघांचा मृत्य झाल्याने चेतन एकनाथ वाणी यांच्या फिर्यादीवरून बस चालक किशोर काशिनाथ मोरे (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जितेंद्र वल्टे हे करत आहे.