जळगाव समाचार | १३ नोव्हेंबर २०२५
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) बळकट करण्याच्या दृष्टीने शहरातील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी शिंदे गटात दाखल झाले. पक्षाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख कुंदन काळे, तसेच अन्य पदाधिकारी या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “संघटन हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. सत्ता मिळवणे हे आपले ध्येय नसून लोकांचा विश्वास जिंकणे हेच आपले खरे बळ आहे. जळगावच्या विकासासाठी जुने-नवे सर्व कार्यकर्ते एकत्र राहून नियोजनबद्ध काम करा आणि युतीचा झेंडा महापालिकेवर फडकवा,” असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, इतर पक्षांमधून होत असलेला हा प्रवेश म्हणजे विकासाची पावती आहे. पालकमंत्री पाटील यांनी जळगाव महापालिकेसाठी आतापर्यंत सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत शहरातील रस्ते, गटारी व मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून दिला आहे.
या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक अण्णा भापसे, चंद्रकांत भापसे, विशाल राठोड, जगन गिरमळकर, दाऊदी सोनवणे, संगीता भारंबे, कविता परदेशी, अनिता भापसे, सुनील भापसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पंचशिला सूर्यवंशी, स्मिता कांबळे, हर्षवर्धन सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, युवसेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, गणेश सोनवणे, किशोर भोसले, स्वप्नील परदेशी, माजी नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, चेतन सनकत, बाळासाहेब चव्हाण, आशुतोष पाटील, संतोष मुथा, अमोल मोरे, विकी काळे, सचिन पाटील आणि शंतनू नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता कोल्हे यांनी केले तर आभार कुंदन काळे आणि गणेश सोनवणे यांनी मानले.

![]()




