जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑक्टोबर २०२४
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज गुरुवारी सकाळी प्रचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची घटना घडली आहे. त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
सोनवणे हे आज सकाळी चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना तालुक्यातील ममुराबाद येथे अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्वरित उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून प्रकृती स्थिर ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांची तब्येत उत्तम आहे आणि येत्या चार दिवसांत ते पुन्हा प्रचारात सहभागी होतील.