जळगाव समाचार | १२ डिसेंबर २०२५
लातूरचे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (वय 91) यांचे आज पहाटे लातूर येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून देवघर, लातूर येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाचा विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात करत त्यांनी राज्य आणि केंद्राच्या पातळीवर प्रभावी नेतृत्व केले. नगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो. काही काळ त्यांनी लातूरच्या विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली. काँग्रेसकडून राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते, मात्र शेवटच्या क्षणी प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्याने त्यांची संधी हुकली. सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मोठा मान होता. भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांच्या विरोधात लढलेल्या खासदारकीच्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांना “अच्छे आदमी” असे संबोधले होते, आणि ती निवडणूक पाटील यांनी जिंकली होती.
शिवराज पाटील यांनी सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिका बजावली. लातूरचे नगराध्यक्ष (1966–1970), आमदार (1972–1980), विधानसभा उपाध्यक्ष (1977–1978) आणि अध्यक्ष (1978–1979) या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. 1980 ते 2004 दरम्यान ते सलग लातूरचे लोकसभा सदस्य होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांनंतर ते 1991–1996 या काळात लोकसभा सभापती झाले. यूपीए सरकारमध्ये ते 2004 ते 2008 या काळात केंद्रीय गृहमंत्री होते. त्यानंतर ते 2010 ते 2015 या काळात पंजाबचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणातील एक अनुभवी, शांत आणि संयमी नेतृत्व हरपले आहे.

![]()




