जळगाव समाचार | ४ मे २०२५
वयाच्या १२८व्या वर्षी जगभर प्रसिद्ध असलेले योगगुरू स्वामी शिवानंद बाबा यांनी शनिवारी रात्री ८.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर बीएचयू रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने वाराणसीसह देशभरात त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.
स्वामी शिवानंद बाबा यांचे पार्थिव दुर्गाकुंड येथील त्यांच्या आश्रमात ठेवले जाणार आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवानंद बाबा यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालमधील श्रीहट्टी जिल्ह्यात झाला. भूकबळीमुळे त्यांनी लहानपणीच आई-वडील आणि बहिणीला गमावले. लहानपणापासूनच त्यांनी बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडे राहून योगाचे शिक्षण घेतले. शाळेत न जाता त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले.
वयाच्या ६व्या वर्षी त्यांनी योगाभ्यास सुरू केला आणि त्यानंतर ३४ देशांमध्ये जाऊन योगाचा प्रचार केला. त्यांनी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या थोर व्यक्तींनाही जवळून पाहिलं.
शिवानंद बाबा रोज पहाटे ३ वाजता उठायचे, थंड पाण्याने स्नान, तासभर योगाभ्यास, संध्याकाळी पुन्हा स्नान आणि स्वतःच्या कामाची जबाबदारी स्वतः घेत असत. तीन वेळा संक्षिप्त योगासनं, सात्विक जीवनशैली आणि अर्धपोटी आहार हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
स्वामी शिवानंद बाबांना ३ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.

![]()




