जळगाव समाचार | १ जून २०२५
शहरातील शिवकॉलनी चौकात रविवारी (१ जून) दुपारी ३ वाजता झालेल्या एका भीषण अपघातात सोनार (साधारण ४०-४५), हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी नुसार मृत यांचे नाव विशाल सोनार असल्याचे सांगितले गेले. श्री. सोनार हे धरणगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते.
प्रत्यक्षदर्शींनुसार, खोटेनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने सोनार यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस आणि वाहतूक विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.
शिवकॉलनी चौक हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी येथे झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बसवले होते. मात्र, उन्हाळ्यात डांबर वितळल्याने स्पीड ब्रेकर निष्प्रभ ठरले, तसेच रविवार असल्याने सिग्नल बंद होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.