जळगाव समाचार | २२ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि मुक्ताईनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारीनंतर तिरंगी–चौरंगी ऐवजी थेट द्वंद्व लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पाचोऱ्यात छाननीनंतर पात्र ठरलेल्या तिघांपैकी शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार जया पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने आता शिंदे गटाच्या सुनिता किशोर पाटील व भाजपच्या सुचेता दिलीप वाघ यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची लढत बनत असलेली ही निवडणूक आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपने शहरात मोठी प्रचारफेरी काढत शक्तिप्रदर्शन केले असून पाचोऱ्यातील लढत चुरशीची बनली आहे.
या लढतीला उत्तर देत शिंदे गटानेही आमदार किशोर पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे. नगर परिषद निवडणुकांसाठी प्रभारी नियुक्त करताना पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर आणि शेंदुर्णीची सूत्रे आमदार पाटील यांच्याकडे देऊन शिंदे गटाने त्यांचे राजकीय वजन अधिक वाढवले आहे. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येते.
मुक्ताईनगरातही अशीच स्थिती असून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी त्यांच्या कन्या संजना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या भावना ललित महाजन मैदानात असल्याने येथेही थेट लढत निश्चित झाली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी ‘सोयीची भूमिका’ घेतल्याचा आरोप करत आमदार पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे बोलले जात असून मुक्ताईनगरातील लढतही तापलेली आहे.

![]()




