जळगाव समाचार डेस्क| २४ ऑगस्ट २०२४
भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक वर्षे धावांचा पाऊस पाडणाऱ्या आणि आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनने आपल्या समाजमाध्यम खात्यांवरून एक व्हिडीओ पोस्ट करून हा निर्णय जाहीर केला आहे, ज्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हिडीओ येथे पहा…
धवनने आपल्या व्हिडीओत त्याच्या संपूर्ण क्रिकेट प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 1 मिनिट 17 सेकंदांच्या या व्हिडीओत त्याने क्रिकेटचे गुरु, सहकारी खेळाडू, बीसीसीआय, आयसीसी, आणि चाहते यांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या कारकिर्दीचा निरोप घेतला आहे.
शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याची आक्रमक फलंदाजी ही भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरली होती. 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या धवनने 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. तथापि, 2022 पासून तो भारतीय संघातून बाहेर होता.
शिखर धवनने इंडियन प्रीमियर लीगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून त्याने संघाला नेतृत्व केले. आयपीएलमध्ये खेळलेल्या 222 सामन्यांमध्ये त्याने 6769 धावा केल्या, 51 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली. एप्रिल 2024 मध्ये पंजाब किंग्जने त्याला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
धवनच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो भारतीय संघात कायमच आघाडीवर राहिला. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला असून त्याच्या चाहत्यांना देखील याचा मोठा धक्का बसला आहे.