जळगाव समाचार डेस्क | १५ ऑक्टोबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही जोरात सुरू असल्याची माहिती आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली असून, हे नेते मंगळवारी सकाळीच आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याचसोबत, शिंदे गटातील दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील दोन नेतेही मंगळवारी आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी केवळ 7 जणांची नावं राज्यपालांकडे देण्यात आली असून, त्यात भाजपला 3, राष्ट्रवादीला 2 आणि शिवसेनेला 2 जागा दिल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपकडून महामंत्री विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि महंत बाबूसिंग महाराज यांना संधी देण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ यांची वर्णी
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह आणखी एका नेत्याला संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नेत्यांचा शपथविधी आज सकाळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम
महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. या पदावर रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते, असे सूत्रांकडून समजते.
आज आचारसंहितेची शक्यता
आज म्हणजेच मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मंगळवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे मानले जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या राजकीय हालचालींनी वेग घेतल्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीच्या बातम्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.