जळगाव समाचार डेस्क| ३१ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील शांतता आणि जातीय सलोखा कायम राखण्याच्या उद्देशाने आज जिल्हास्तरावर शांतता समितीची बैठक पार पडली. ही बैठक जळगाव पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री मा. गिरिष महाजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद सीईओ मा. अंकित गोयल, महानगरपालिका आयुक्त मा. ज्ञानेश्वर डेरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नव्याने नियुक्त झालेल्या शांतता समिती सदस्यांचे अभिनंदन केले. त्यांनी नागरीकांना जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले आणि येणारा गणेशोत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आणि महिलांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांना आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी गणेश मूर्तींची उंची मर्यादित ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले, जेणेकरून विसर्जन मार्गात अडथळे येणार नाहीत. गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत त्यांनी गणेश मंडळांच्या अडचणींचे निरसन केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गणेश मंडळांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर एक खिडकी योजना सुरु करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आणि कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टर्स किंवा गाणी न लावण्याचे आवाहन केले. तसेच, वाहतुकीला अडथळा होईल असे मंडप उभारू नयेत, असेही त्यांनी सुचवले.
बैठकीचे सुत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णात पिंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते यांनी केले.