जळगाव समाचार डेस्क | १० सप्टेंबर २०२४
चोपडा येथील साईबाबा कॉलनीचे रहिवासी आणि 105 बटालियन बीएसएफमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल अरुण दिलीप बडगुजर (वय ४२) हे 9 सप्टेंबर 2024 रोजी त्रिपुरा राज्यातील बांगलादेश सीमारेषेवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावले. आगरताळा येथे दहशतवाद्यांशी लढत असताना अरुण बडगुजर यांना वीरगती प्राप्त झाली. या दु:खद घटनेनंतर चोपडा शहरात शोककळा पसरली आहे.
अरुण बडगुजर हे मागील २० वर्षांपासून बीएसएफमध्ये देशसेवा करत होते आणि केवळ ४ महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, देशसेवेत त्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या शहादतीची बातमी येताच शहरातील नागरिकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
अरुण बडगुजर यांचे पार्थिव 11 सप्टेंबर रोजी रात्री 12:25 वाजता इंदौर विमानतळावर पोहोचणार असून, तेथून बीएसएफ वाहनाद्वारे त्यांच्या मूळगावी चोपडा येथे आणले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार चोपडा येथे करण्यात येणार आहेत.
डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी या घटनेची पुष्टी केली असून, शहीद जवानाचे अंतिम संस्कार योग्य सन्मानाने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.