आज राज्यातील 40 हजार शाळा बंद; शिक्षकांचे मोठे आंदोलन…

0
52

 

जळगाव समाचार डेस्क | २५ सप्टेंबर २०२४

विद्यार्थी तसेच पालकांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 40 हजार प्राथमिक शाळा आज, बुधवारी, बंद राहण्याची शक्यता आहे. शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी भरतीविरोधात सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी जवळपास 29 हजार शिक्षक आज सामूहिक रजेवर जाणार आहेत आणि विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांकडून मोर्चे काढले जाणार आहेत.
या आंदोलनात राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक सहभागी होणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे. या धोरणानुसार, 20 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक नेमण्यात येणार आहे, तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे.
शिक्षक संघटनांच्या मते, या निर्णयामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. राज्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here