जळगाव समाचार डेस्क
देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बैंक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या इंटर्नल बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेडिग रेटमध्ये (एमसीएलआर) आधार बिंदू ५ (०.०५%) ते १० (०.१०%) वाढ करण्यात आली आहे, असे बँकेने सांगितले. त्यामुळे या आधारभूत किमतीशी संबंधित सर्व कर्ज आणि त्याच्या मासिक हप्त्यातही वाढ होणार आहे. अर्थातच गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार असल्याने कर्ज घेणेही आता महाग होणार आहे.
स्टेट बँकेकडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे १ वर्षांच्या कालावधीच्या कर्जावर एमसीएलआर ८.८५% झाला आहे. याच धर्तीवर ३ महिन्यांच्या कर्जावर एमसीएलआर ८.४%, ६ महिन्यांवर ८.७५% आणि २ वर्ष कालावधीच्या कर्जावर एमसीएलआर ८.९५% वर गेला आहे. स्टेट बँकेच्या पावलावर पाऊल ठेवून आता इतर बँकाही व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.