जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्या परिसरातील कोरड्या तलावात एका ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. १४ एप्रिल) दुपारी समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर परिसरातून जात असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तलावात मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ यावल पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महिला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनास्थळाची स्थिती पाहता घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर मृतदेह पुढील तपासासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू आहे.