जळगाव समाचार डेस्क | २३ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या संत, महात्मा, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची परंपरा आजवर जपली आहे. मात्र, यामध्ये विठ्ठलांचे निस्सीम भक्त, वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी, आणि सोनार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी सोनार महाराजांचा समावेश करण्यात आलेला नाही.
यासंदर्भात सोनार समाजाने शासनाकडे संत नरहरी सोनार यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात २०२५ सालापासून संत नरहरी सोनार महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
संत नरहरी सोनार हे विठ्ठल भक्तीच्या परंपरेत विशेष स्थान असलेले संत होते. त्यांनी समाज सुधारणा आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांमध्ये एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी त्यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.