संत गजानन महाराजांनी आपल्या कृतीतून दिली “अन्न हे पूर्णब्रम्ह” असल्याची शिकवण – रोहिणी खडसे

जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४

संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा मुक्ताईनगर येथील संत गजानन महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली होती. या निमित्ताने दरवर्षी या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

मंदिर परिसर फुलांच्या आणि आंब्याच्या तोरणांनी सजवला गेला होता, आणि भक्तिमय वातावरणात “गण गण गणात बोते” या मंत्राच्या गजरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि डॉ. प्रांजल खेवलकर उपस्थित होते. त्यांनी श्रींचा अभिषेक करून विधिवत पूजा अर्चा केली.

यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “संत गजानन महाराजांनी आपल्या कृतीतून अन्न हे पूर्णब्रम्ह असल्याची शिकवण दिली आहे. त्यांनी उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ल्याने अन्नाचा अपमान करू नये, नासाडी टाळावी, असे प्रत्यक्ष उदाहरण दिले.” त्याचबरोबर त्यांनी “गण गण गणात बोते” या मंत्राचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, “प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे, आणि आपल्याला प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवले पाहिजे.”

कार्यक्रमाच्या शेवटी, रोहिणी खडसे यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच पुष्पाताई खेवलकर, मंदाताई खडसे यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here