जळगाव समाचार | ४ ऑक्टोबर २०२४
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड दिले आहे. “गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत”, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसेच “महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात”, असंदेखील वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
संभाजी बिग्रेडचे नेते संतोष शिंदे यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी करत, “मनोहर उर्फ संभाजी भिडे हा विकृत माणूस आहे. तो नेहमीच हिंदू समाज व स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करतो. महाराष्ट्रातील दंगलींमध्ये त्याचा मोठा हात आहे, आणि अशा व्यक्तीला महाराष्ट्रात मान्यता देणे हा समाजासाठी कलंक आहे,” अशी टीका केली आहे.
संभाजी बिग्रेडने या प्रकरणी सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. “भिडे यांच्या वक्तव्याला सरकार नेहमी पाठीशी घालत आहे. हिंदू समाजाला अपमान करणाऱ्या या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी शिंदे यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील भिडे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. “भिडे यांचे वय झाल्यामुळे त्यांच्या मानसिक स्थैर्यावर परिणाम झाला आहे. त्यांचे बोलणे समाजासाठी योग्य नाही, आणि त्याकडे फारसे महत्त्व देण्याची आवश्यकता नाही,” असे आव्हाड म्हणाले.