जळगाव समाचार | १ फेब्रुवारी २०२६
मुंबईतील जुहू परिसरात प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी (१ फेब्रुवारी) पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित इमारतीभोवती तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी इमारतीच्या दिशेने पाच राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. गोळीबाराच्या वेळी रोहित शेट्टी घरी उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पाच रिकामे काडतुसांचे तुकडे जप्त केले असून, पुरावे संकलनासाठी फॉरेन्सिक पथकही तैनात करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ विशेष पथकं तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रोहित शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्राथमिक चौकशी केली आहे.
दरम्यान, याआधी अभिनेता सलमान खान यांच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बिश्नोई गँगचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यामुळे या प्रकरणातही बिश्नोई गँगचा हात असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत; मात्र सध्या त्याबाबत ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. सोशल मीडियावर घटनास्थळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातल्याचे दिसून येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर रोहित शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

![]()




