जळगाव समाचार डेस्क | ६ नोव्हेंबर २०२४
धामोडी – मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान मतदारांना आशीर्वाद मागितले. रावेर तालुक्यातील वाघाडी, धामोडी, रेंभोटा, कांडवेल, कोळोदा, निंबोल, सुलवाडी, शिंगाडी, ऐनपूर, विटवे, सांगवे गावांतून प्रचार रॅली काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. गावागावांत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुवासिनींनी औक्षण करत रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.
प्रचाराच्या वेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण दादा पाटील, राजाराम महाजन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधिमंडळात आवाज उठवीन.” गेल्या तीस वर्षांत एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघात केलेला विकास पुढे चालवण्याची ग्वाही देत त्यांनी मतदारांकडून मतदानरूपी आशीर्वाद मागितला.
यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, “आ. एकनाथराव खडसे यांनी जात-पात विसरून जनहिताचे राजकारण केले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी कृषीमंत्री असताना केळी पिक विमा योजना सुरू करून जाचक अटी काढून टाकल्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी विकास महामंडळ स्थापनेची घोषणा करूनही महामंडळ स्थापन केले नाही.” मतदारसंघाचा शाश्वत विकास आणि केळी उत्पादकांना विविध सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी रोहिणीताई खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले की, “मागील निवडणुकीत पराभव होऊनही रोहिणीताई खडसे गेल्या पाच वर्षांत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाल्या आहेत. मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी पाठपुरावा आणि आंदोलने केली आहेत. अशा जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उच्चशिक्षित उमेदवाराला विधानसभेत पाठवावे.” यावेळी रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रोहिणी खडसे यांच्या विजयाचा विश्वास उपस्थितांमध्ये दिसून आला.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये रविंद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, शिवसेना (उबाठा) गटाचे अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी पं.स. सदस्य दीपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सचिन महाले, सुनील कोंडे, पवन चौधरी, अमोल महाजन, शशांक पाटील, मंदार पाटील, रवींद्र पाटील, श्रीकांत चौधरी, भागवत कोळी, अरविंद पाटील, मधुकर पाटील, सुमित सावरने, मनोज गोसावी, सलमान खान, महमूद शेख, नितीन पाटील, दीपक पाटील सर, केतन पाटील, उज्वल पाटील, सोनू पाटील, संजय पाटील, परेश गोसावी, राजेंद्र चौधरी, अर्चना पाटील, चेतन पाटील, भूषण पाटील, गणेश देवगिरीकर, रोहन चऱ्हाटे, सागर मराठे, जगन्नाथ पाटील, सुनील पाटील, संतोष कचरे, मयूर पाटील, आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.