जळगाव समाचार डेस्क | २७ सप्टेंबर २०२४
मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यांमध्ये सततच्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी खडसे म्हणाल्या की, सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी आनंदी होते, परंतु जुलैपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने मका, सोयाबीन, उडीद, मुग आणि भुईमूग पिके जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पिकांवर बोंडअळी, मर आणि लाल्या या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, कपाशीच्या कैऱ्या सडायला लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ हिरावून गेले आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांची निगा राखली होती, मात्र पिकांची काढणी सुरू असतानाच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारख्या पावसाने कापलेले मका आणि सोयाबीन वाहून गेले आहेत.
या कठीण परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
यावेळी बोदवड बाजार समितीचे संचालक अंकुश चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रविण दामोधरे, तसेच तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे उपस्थित होते.