मुक्ताईनगर, जळगाव समाचार डेस्क;
माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातली पहिली पायरी असते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुला-मुलींना कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात करिअरच्या अनेक वाटा आहेत,मात्र आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे योग्य निर्णय घेऊन सातत्यपूर्ण अभ्यासाचे नियोजन केल्यास हमखास यश मिळण्याची खात्री असते.शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होणे, संस्कारित होणे अपेक्षित असते. विद्येने व्यक्ती विनम्र होते, अंगी विनम्रता असल्यास तुमचे भविष्य उज्वल राहील.तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असे सांगून शिक्षणाशिवाय जीवनात परिवर्तन होणे शक्य नाही,हे ओळखून चिकाटीने प्रयत्न करा, जिद्द सोडू नका, तुम्ही ठरवलेल्या क्षेत्रात घवघवीत यश संपादन करुन आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.
संवेदना फाउंडेशनतर्फे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील इयत्ता दहावी- बारावीतून विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील तर उद्घाटक म्हणून माफदाचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष विनोद तराळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क.ब.चौउ.म.वि.चे प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, ईश्वर रहाणे, ह. भ.प. विशाल महाराज खोले, भागवत पाटील, सुधीर तराळ, निवृत्ती पाटील, राम पाटील, पवनराजे पाटील, दत्ता पाटील, माणिकराव पाटील उचंदा, निलेश पाटील, डॉ.बी.सी.महाजन, अनिल वराडे, सोपान दुट्टे, अतुल पाटील, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, निलेश पाटील, नितीन कांडेलकर, सतिष पाटील, वामन ताठे, विशाल रोटे, संजय पाटील, हकीम बागवान, रउफ खान, शेख मुस्ताक, प्रदीप साळुंखे, निलेश भालेराव, राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या विविध वाटा या विषयातील विविध पैलूवर प्रकाश टाकत उपस्थितांना तासभर खिळवून ठेवले. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी त्यांच्या कीर्तनाच्या स्टाईल मधून साध्या -सोप्या भाषा शैलीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद करून, अभ्यास करा, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे स्पष्ट करुन, आईबापाने तुमच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवा, सतत त्यांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे जीवनात प्रगती साधण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा सल्ला त्यांनी मुलांना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे आयोजित या गुणगौरव सोहळ्यामध्ये मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रांतर्गत सर्व माध्यमिक विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिंनींना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकांसह संबंधित संस्थाध्यक्ष, शाळांचे मुख्याध्यापक आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीव साळवे, प्रा. डांगे, प्रा.प्रतिभा ढाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संवेदना फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.