जळगाव समाचार | ११ मार्च २०२५
भारतीय स्टेट बँकेने (SBI) राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बँक खात्यावर लावलेला ‘फ्रॉड क्लासिफिकेशन’ टॅग हटवला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र कंपनीला देण्यात आले असून, यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 520 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी कारवाई करत राजमल लखीचंद ग्रुपच्या बँक खात्यावर हा टॅग लावला होता. त्यांनी हा निर्णय सर्व बँकांना कळवला होता. या कारवाईला विरोध करत राजमल लखीचंद ग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांच्यावर कारवाई झाली असली तरी त्यांना फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल दिला गेला नाही.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने 18 फेब्रुवारी रोजी हा टॅग हटवला आणि याबाबतचे अधिकृत पत्र राजमल लखीचंद ग्रुपला दिले.
याबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार ईश्वरलाल जैन म्हणाले,
“आज आमच्यासाठी दिवाळी आहे. खात्यावर हा टॅग लागल्यामुळे आम्हाला आणि आमच्या नातेवाईकांना कोणी कर्ज देत नव्हते. व्यापारी व ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज पसरले होते. मात्र आता आम्हाला न्याय मिळाला आहे.”
स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या व्यवसायावर झालेला नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होणार आहे.