जळगाव समाचार | ११ नोव्हेंबर २०२५
वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंवर सन्मानांचा वर्षाव सुरू असताना पश्चिम बंगालची तरुण खेळाडू ऋचा घोषला मिळालेला बहुमान देशात नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दार्जिलिंगमध्ये उभारल्या जाणाऱ्या नव्या क्रिकेट स्टेडियमला ऋचाचे नाव देण्याची घोषणा केली. अनेक दिग्गज पुरुष क्रिकेटपटूंनाही न मिळालेला हा सन्मान एका महिला क्रिकेटपटूला मिळणे ही भारतातली पहिलीच वेळ आहे.
कोलकात्यात पश्चिम बंगाल सरकारतर्फे आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी 27 एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या स्टेडियमची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी कर्णधार सौरव गांगुली, दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ऋचा क्रिकेट स्टेडियम या नावाने भावी पिढ्या ऋचाच्या विक्रमी कामगिरीची दखल घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
समारंभात ऋचाला सुवर्णांकित बॅट आणि बॉल देऊन गौरवण्यात आले. या स्मरणिकांवर गांगुली आणि झूलन यांची स्वाक्षरी असून बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान खेळाडूंच्या यादीत ऋचाचा समावेश झाल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले. पश्चिम बंगाल सरकारने ऋचाला बंगभूषण पुरस्कारही जाहीर केला असून याअंतर्गत तिला सोन्याची माळ तसेच पोलिस दलात डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ही पदवी देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
ऋचाच्या वर्ल्डकपमधील दमदार कामगिरीमुळे बंगालसोबतच संपूर्ण देशाचे नाव उंचावले असल्याचे गांगुली यांनी सांगितले. भविष्यात ती भारतीय संघाची कर्णधार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दार्जिलिंगमधील हे स्टेडियम आकारास आल्यास भारतीय महिला क्रिकेटसोबत एकूणच भारतीय क्रीडा इतिहासातील तो एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

![]()




