जळगाव समाचार | २ सप्टेंबर २०२५
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो आता या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणार नाही. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वीच त्याने हा मोठा निर्णय घेतला.
स्टार्क 2021 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. तो टी-20 वर्ल्डकप 2024 साठीही संघात सामील होता. मात्र त्या स्पर्धेनंतर त्याने एकही टी-20 सामना खेळलेला नव्हता.
टेस्ट-वनडेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय
निवृत्तीबाबत बोलताना स्टार्क म्हणाला, “टेस्ट क्रिकेट हे माझ्यासाठी नेहमीच पहिले प्राधान्य राहिले आहे. 2021 च्या वर्ल्डकपमध्ये संघाचा भाग होणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पण आगामी भारत दौरा, अॅशेज मालिका आणि 2027 चा वनडे वर्ल्डकप लक्षात घेऊन फिटनेस आणि कामगिरीसाठी हा निर्णय योग्य वाटला.”
तो आता टेस्ट, वनडे आणि जगभरातील डोमेस्टिक टी-20 लीगमध्ये (जसे की आयपीएल) खेळताना दिसणार आहे.
टी-20 कारकिर्दीतील कामगिरी
मिचेल स्टार्कने 2012 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 65 सामन्यांत त्याने 79 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. लेग-स्पिनर अॅडम झम्पा (130 विकेट) अव्वल स्थानावर आहे.