राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत; मंत्रालयाकडे राज्याचे लक्ष

 

जळगाव समाचार | २२ जानेवारी २०२६

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रालयाकडे लागले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर या आरक्षण सोडतीला प्रारंभ होणार आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या ५० टक्के महिला आरक्षणाच्या नियमांनुसार यंदा १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर, तर १४ महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे.

महिला आरक्षणांतर्गत ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित ठिकाणी अनुसूचित जाती-जमातीसह अन्य प्रवर्गांचे आरक्षण कसे असेल, हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. आरक्षणाच्या या प्रक्रियेवर आगामी महापौर निवडींची दिशा ठरणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीही आज चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. मागील वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्ग असे आरक्षण पडले होते. त्यामुळे यावेळी कोणता प्रवर्ग लागणार, यावर पक्षनिहाय नगरसेवकांची संख्या, संभाव्य दावे आणि राजकीय गणिते अवलंबून आहेत. आरक्षण निश्चित होताच महापौरपदासाठी उमेदवारीच्या हालचालींना वेग येणार असून, इच्छुक नगरसेवकांचे राजकीय भवितव्य या सोडतीवर ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here