जळगाव समाचार | 4 जून 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मंगळवारी (3 जून) आयपीएल 2025 चा अंतिम सामना जिंकून पहिल्यांदाच चॅम्पियन होण्याचा इतिहास रचला. पंजाब किंग्जवर 6 धावांनी विजय मिळवून आरसीबीने जेतेपद पटकावले. मात्र या ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी झालेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान मोठा अनर्थ घडला.
बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. या गर्दीचा ताबा सुटल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने मिळवलेलं जेतेपद साजरं करण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. संघाची विजयी मिरवणूक एम. चिन्नास्वामी स्टेडियमपासून विधान सौधेपर्यंत नियोजित होती. मात्र गेट नंबर 3 जवळ मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले आणि गर्दीचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.
गर्दी एवढी होती की काही चाहते झाडांवर चढून आणि फांद्यांवर बसून मिरवणूक पाहण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी प्रयत्न करूनही गर्दी नियंत्रणात आणता आली नाही.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “मोठी गर्दी झाली, याबद्दल मी माफी मागतो. आम्ही 5,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले होते, पण ही तरुणांची उत्साही गर्दी होती. आम्ही लाठीचार्ज करू शकत नव्हतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर कर्नाटक सरकारने विधान सौध ते स्टेडियमपर्यंतची आरसीबीची विजयी मिरवणूक रद्द केल्याची घोषणा केली आहे.
या दुःखद घटनेमुळे संपूर्ण बंगळुरू शहरात हळहळ व्यक्त होत असून, आरसीबीच्या ऐतिहासिक विजयावर दु:खाचा काळा रंग चढला आहे.