जळगाव समाचार | २९ मे २०२५
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने 9 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी न्यू चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जला 8 विकेट्सने पराभूत केलं.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केवळ 14.1 षटकांत 101 धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. बंगळुरूच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत सुयश शर्मा आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यश दयालनेही 2 विकेट्स घेतल्या.
आरसीबीकडून सलामीवीर फिल साल्टने अर्धशतक झळकावलं आणि संघाने 10 षटकांतच विजय मिळवला.
आरसीबीने चौथ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी याआधी 2016 मध्ये अंतिम सामना खेळला होता, पण विजेतेपद मिळवू शकले नव्हते. यंदाचा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादमध्ये होईल.
दुसरीकडे, पंजाब किंग्जला अजून एक संधी मिळणार आहे. ते 1 जून रोजी क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटर विजेत्याशी सामना खेळतील. एलिमिनेटर सामना 31 मे रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यात होणार आहे.