रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : चार अल्पवयीन मुलींचा यशस्वी शोध


जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५

तालुक्यातील विविध तीन घटनांमध्ये फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलींचा यशस्वी शोध लावण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. संबंधित चारही मुलींना विविध राज्यांमधून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एका प्रकरणात एकाच गावातील दोन अल्पवयीन मुलींना दोन अल्पवयीन मुलांनी फूस लावून पळवले होते. हे सर्वजण २२ दिवसांपासून मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांत फिरत होते. अखेर रावेर पोलिसांनी सतत पाठलाग करून ओडिशातील मकपदरा जंगलात २० तास दबा धरून १२ एप्रिल रोजी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रावेर पोलिस ठाण्यात आणून १४ एप्रिल रोजी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात इंदूर (मध्य प्रदेश) येथून १३ एप्रिल रोजी एक मुलगी तर तिसऱ्या प्रकरणात खकनार (म.प्र.) येथील नायर गावातून १२ एप्रिल रोजी एक मुलगी शोधण्यात आली. दोघींनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तपासात फौजदार महेंद्र महाजन, नितीन सपकाळे, तुषार पाटील, दीपाली पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि नातेवाइकांची चौकशी करून हे सर्व पथक तपास करत होते.

पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, पोकॉ. सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here