जळगाव समाचार | १ एप्रिल २०२५
रावेर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली असून, आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
रावेर तालुक्यातील आभोडा येथे राहणाऱ्या आशा संतोष तायडे (वय ३८) या महिलेचा तिच्या पतीने खून केला. संतोष तायडे हा शेती व मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (३१ मार्च) सकाळी ६ वाजता त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी संतोष तायडे हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात गेला व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या तीन दिवसांत रावेर तालुक्यातील ही दुसरी खुनाची घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.