जळगाव समाचार डेस्क| १ नोव्हेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील रावेर हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला होता. काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी बाजी मारत हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. आता या निवडणुकीत काँग्रेसकडून शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे. हे नवयुवक आणि प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत असल्याने त्यांना मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.
दुसरीकडे, भाजपाने या निवडणुकीत माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्या मुलाला, अमोल जावळे यांना उमेदवारी दिली आहे. अमोल जावळे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या वडिलांचे या मतदारसंघात मोठे योगदान आहे. हरिभाऊ जावळे यांच्या स्वर्गवासानंतर अमोल यांनी ही जबाबदारी उचलली असून, त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
याशिवाय, मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले अनिल चौधरी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत ते जनतेचे मन जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी ४४,८४१ मते मिळवली होती.
वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीत शमीबा पाटील या तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. रावेर मतदारसंघात पाटील समाजाचा मोठा प्रभाव असून, त्यानंतर आदिवासी व मुस्लिम समाजाची संख्याही लक्षणीय आहे.
२०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदार २,९७,४०८ होते. त्यापैकी २,०१,४५० मतदारांनी मतदान केले होते, जो ६७.७% इतका होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचे शिरीष चौधरी यांनी ७७,९४१ मते मिळवून विजय मिळवला होता, तर भाजपाचे हरिभाऊ जावळे यांना ६२,३३२ मते मिळाली होती. अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून २२.३% मते मिळवत चांगले यश साधले होते.
आता या निवडणुकीत जनता कोणाला संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.