रावेर शहरात घरफोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक, 78 हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव समाचार डेस्क | 8 सप्टेंबर 2024

रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करत शहरातील घरफोडी प्रकरण उघडकीस आणले असून, दोन आरोपींना अटक करून 78,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी प्रविण सिताराम महाजन (वय 34, रा. श्रीकृष्णनगर, रावेर) यांनी त्यांच्या बंद घरातून चांदीचे दागिने आणि 22,500 रुपये रोख चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी केली होती.

पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान, रावेर-सावदा रोडवरील एस.एस. विवे पेट्रोल पंपाजवळील गैबानशहा दर्ग्याच्या टेकडीखाली दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची ओळख गोलुसिंग नसीबसिंग पटवा (वय 20, रा. पाचौरी, मध्यप्रदेश) आणि सुनिलसिंग कैलाससिंग बरनाल (वय 26, रा. धार, मध्यप्रदेश) अशी करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेले चांदीचे पैंजण, रोख रक्कम, तसेच चोरीसाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी एकूण 78,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here