रावेर तालुक्यात पोलिसांचा अवैध गोवंश कत्तलखान्यावर छापा ; ७४० किलो मांस, हत्यारे जप्त; चार अटकेत…

जळगाव समाचार | १० मे २०२५

रावेर तालुक्यातील रसलपूर गावात पोलिसांनी गुप्त माहितीवरून केलेल्या मोठ्या कारवाईत अवैध गोवंश कत्तलखाना उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे अंदाजे ७४० किलो गोवंश मांस, चार कुऱ्हाडी, चार सुरे आणि चार जनावरांची कातडी जप्त केली आहे. घटनास्थळावरून चार आरोपींना अटक, तर चार आरोपी फरार झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात, मरीमाता मंदिराच्या पाठीमागे, सलीम उस्मान कुरेशी यांच्या घरासमोर एका मोकळ्या जागेत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पो.कॉ. कल्पेश आमोदकर, पो.कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. सुकेश तडवी, पो.कॉ. श्रीकांत चव्हाण आणि दोन पंच अशा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी छापा टाकला असता, आठ इसम एका मोकळ्या जागेत खाली बसून गोवंश मांस कुऱ्हाडी व सुऱ्यांनी कापत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यापैकी चार जणांना अटक केली, तर इतर चार जण पोलीस येताच पळून गेले.

अटक झालेल्या आरोपींची नावे:
1. शेख वसीम शेख कय्युम कुरेशी (वय २५)
2. शेख शकील शेख कलीम कुरेशी (वय २४)
3. शेख सलीम शेख उस्मान कुरेशी (वय ६०)
4. शेख अनिस शेख अय्युब कुरेशी (वय ३२)
(सर्व रा. कुरेशी मोहल्ला, रावेर)

फरार आरोपींची नावे (सलीम कुरेशीने पोलिसांना दिलेली माहिती):
1. शेख नुरअहमद शेख सलीम कुरेशी
2. शेख फारुख शेख अय्युम कुरेशी
3. शेख समीर शेख कय्युम कुरेशी
4. शेख फरीद शेख शब्बीर कुरेशी
(सर्व रा. कुरेशी वाडा, रसलपूर)

जप्त करण्यात आलेली वस्तू:
• अंदाजे ७४० किलो गोवंश मांस – किंमत ₹१,४८,०००
• चार गोवंश जनावरांची कातडी
• चार कुऱ्हाडी – ₹१,२००
• चार सुरे – ₹८००

दरम्यान जप्त केलेल्या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीसाठी सील करण्यात आले. उर्वरित मांस रावेर नगरपालिकेच्या मदतीने कचरा डेपोत नष्ट करण्यात आले. पंचनामा करण्यात आला असून, अटक आरोपींना रावेर पोलीस स्टेशनमध्ये आणून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी तपास अधिक तीव्र केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here