जिल्हा राष्ट्रवादी (अप) कडून सरकारकडे ओला दुष्काळ, कर्जमाफीसह हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी…

 

जळगाव समाचार | २९ सप्टेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांसह आता सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनीही सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह भरघोस आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

सप्टेंबर महिन्यात २३ तारखेपर्यंत जिल्ह्यातील ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कपाशी, केळी, कांदा, सोयाबीन, मका, भाजीपाला व फळपिके अशा सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ५१८ गावांमधील एक लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून पाच जणांचा बळी गेला असून त्यात पाचोरा तालुक्यातील तिघांचा, तर भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

याशिवाय, १९२२ पशुधन दगावले असून १०६८ घरांची पडझड झाली आहे. पुराचे पाणी ६८७ घरांत शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ५९२, एरंडोलमध्ये ८० व मुक्ताईनगरमध्ये १५ घरांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. कृषी व महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू असतानाच शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाने पुन्हा जनजीवन विस्कळीत केले.

दरम्यान, “पंचनामे व निकषांचा खेळ न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. “निवडणूक काळात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सरकारने कोणतीही कागदपत्र तपासणी न करता थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मदत द्यावी. पंचनामे व अटींच्या नावाखाली होणारा विलंब अन्यायकारक आहे,” असेही ते म्हणाले.

भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई वितरित करण्याची मागणी केली. त्यानंतर अजित पवार गटाच्या शिष्टमंडळानेही जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदानासह संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, प्रतिभा शिंदे, मीनल पाटील, रवींद्र पाटील आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here