जळगाव समाचार डेस्क;
जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Sharadchandra Pawar) गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा बैठकीतच राजीनामा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा बैठक झाली. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील आदींसह अन्य नेते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आगामी काळातील निवडणुक लक्षात घेता माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्रमक पवित्र घेत जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्यानंतर डॉ. सतीश पाटील यांनी एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमावेत अशी सूचना देखील केली. दरम्यान जामनेरचे डॉ. मनोहर पाटील यांनीही पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. रवींद्रभैय्या पाटील यांनी राजीनामा वरिष्ठांना पाठवून दिल्याचे नमूद केले. यावेळी पक्षाचे जिल्हा निरिक्षक प्रसन्नजीत पाटील यांची देखील उपस्थिती होती.

![]()




