जळगाव समाचार | २६ जानेवारी २०२६
जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी गौरवाचा क्षण ठरावा अशी महत्त्वाची घोषणा समोर आली असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय एकनाथ शेलार यांना सन २०२६ चे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal) जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारतर्फे करण्यात आलेल्या या घोषणेमुळे जळगाव पोलीस दलात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार यांनी पोलीस दलात तब्बल ३५ वर्षांची प्रदीर्घ, निष्ठावंत आणि निष्कलंक सेवा बजावली आहे. त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ पद्धतीने काम केले. उल्लेखनीय बाब म्हणजे या ३५ वर्षांच्या सेवेत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना एकूण २४२ बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सेवेत एकही शिक्षा, दंड अथवा ताकीद नोंदलेली नसून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ राहिले आहे.
कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठरावा अशी बाब म्हणजे, संपूर्ण ३५ वर्षांच्या सेवाकाळात ते कधीही आजारपणाची (सिक) रजा न घेता सातत्याने सेवेत कार्यरत राहिले. त्यांच्या या शिस्तप्रिय वृत्तीची आणि कामावरील निष्ठेची दखल घेत भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. या सन्मानाबद्दल जळगाव जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी व नागरिकांकडून श्री. संजय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

![]()




