जळगाव समाचार डेस्क | ४ नोव्हेंबर २०२४
राज्यातील पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सातत्याने रश्मी शुक्ला यांच्या बदलाची मागणी केली होती, आणि आता त्यांच्या या मागणीला यश आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले होते. त्यांनी आरोप केला होता की, रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ मध्ये समाप्त झाली असतानाही भाजप युती सरकारने त्यांना नियमबाह्यरित्या जानेवारी २०२६ पर्यंत बढती दिली होती. तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावणे आणि नियमबाह्य कामे करणे यांसारखी वादग्रस्त कामे त्यांनी केल्याचा आरोपही पटोले यांनी केला होता.
उद्या, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत राज्याच्या प्रशासनाने तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांची निवड करण्यात येणार आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल असताना रश्मी शुक्ला यांची बदली हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. विरोधी पक्षाच्या मागणीनंतर आणि काँग्रेसच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरणात उधाण आले आहे.