जळगाव समाचार | २३ फेब्रुवारी २०२५
भिवंडीतील शांतीनगर परिसरात एका तरुणीला रात्री फोन करून खोटे कारण सांगत बोलावून घेत तिच्यावर दोन निर्जन ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ वर्षीय पीडित तरुणी शेलार येथे आपल्या आतेबहिणीकडे गेली होती. गुरुवारी रात्री तिला भावाचे १५ मिसकॉल आले. मध्यरात्री १२ वाजता जाग आल्यावर तिने फोन करून विचारणा केली असता भावाने ‘माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये’ असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी ओळखीच्या रिक्षाचालकासोबत त्या ठिकाणी पोहोचली.
तेथे आधीच दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू आणि अन्य दोन जण (सर्व रा. फातमानगर) यांनी पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि नागाव येथील झाडाझुडपांत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
याच आरोपींनी पीडितेला पुन्हा फातमानगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडिता, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकी देऊन आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि शांतीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.