जळगाव समाचार डेस्क | ११ ऑक्टोबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना उघड होत असताना, डहाणू तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून गेल्या चार वर्षांपासून अत्याचार होत असल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
२०२० पासून सुरू होते अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील एका निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर तिच्या वडिलांकडून २०२० पासून अत्याचार सुरू असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. शाळेत शिक्षण घेत असलेली ही मुलगी जेव्हा सुट्ट्यांमध्ये घरी येत असे, तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यंदा गणपतीच्या सुट्टीत घरी आल्यावर देखील वडिलांनी तिला त्रास दिल्याचे तिने सांगितले.
लैंगिक जनजागृती कार्यक्रमातून उघड झाली घटना
डहाणू पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या लैंगिक जनजागृती कार्यक्रमादरम्यान या प्रकरणाचा खुलासा झाला. विद्यार्थिनीने या घटनेची माहिती तिच्या शिक्षिकेकडे दिली, त्यानंतर शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन पोलिसांना कळवले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना या प्रकरणाची माहिती होणार नाही, याची दक्षता शिक्षिका आणि पोलिसांनी घेतली आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा, पुढील तपास सुरू
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये महिला पोलिसांनी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन विचारपूस करण्याचे काम सुरू ठेवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस करत आहेत, तसेच मुलीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.