जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२५
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा अमानुष कृत्य करणारा आरोपी अवघ्या 17 वर्षांचा आहे. अत्याचारानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चिमुरडीला ग्वालियरच्या कमला राजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती नाजूक आहे.
ही घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली. चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी ती शेजारच्या एका गच्चीवर बेशुद्ध आणि रक्ताच्या थारोळ्यात सापडली. आरोपीने दारूच्या नशेत असताना तिच्या डोक्याला भिंतीवर आपटले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, डॉक्टरांना तिच्या गुप्तांगाला 28 टाके घालावे लागले. तसेच कोलोस्टोमीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे. तिच्या आईने तर त्याला रस्त्यावर गोळ्या घालण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांनी तीव्र आंदोलन केले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ही घटना फक्त शिवपुरी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक धक्का आहे. पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.