जळगाव समाचार | २२ ऑक्टोबर २०२५
रामानंद नगर पोलिसांनी २०१७ साली झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून एक संशयित आरोपी ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर.एल. कॉलनी, गांधी नगर, जळगाव) यांच्या पिंप्राळा परिसरातील ‘साई ज्वेलर्स’ या दुकानात काम करणारा सुशांत सुनिल कुंडु (रा. हावडा, पश्चिम बंगाल) या कर्मचाऱ्याने एकूण ३० तोळे सोन्याचा अपहार करून पलायन केले होते. त्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४२/२०१७, भा.दं.वि. कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पळून गेल्याने पोलिसांनी अनेक वेळा त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नसल्याने गुन्हा कायम तपासात ठेवण्यात आला होता.
दरम्यान, अलीकडेच आरोपी सुशांत सुनिल कुंडु (वय ३९, रा. नस्कर पारा, संत्रागाच्छी, जिल्हा हावडा, पश्चिम बंगाल) वाराणसी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून कलकत्ता (प. बंगाल) येथे सुमारे १० तोळे (१०० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे, हस्तगत केले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक योगेश बारी, अनिल सोननी आणि अतुल चौधरी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वी केली आहे.

![]()




