जळगाव समाचार डेस्क| २४ जानेवारी २०२५
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. “काळजी करू नका, शासन सर्व प्रकारची मदत करत आहे. जखमी लवकर बरे होतील,” असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी आणि गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर आधी पाचोरा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. केतकी पाटील यांनी मंत्री महोदयांना जखमींच्या उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिली.
श्रीमती खडसे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना सहवेदना दिल्या आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.